मुख्य सामग्रीवर वगळा

माऊली - संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) 

         "ज्ञानेश्वर माऊली" अवघ्या महाराष्ट्राला भावार्थदिपिकेच (ज्ञानेश्वरीचेच आणखी एक नाव) ज्ञान देणारे संत.  वडिल विठ्ठलपंत कुलकर्णी मुळातच विरक्त, लग्नानंतर त्यांनी सन्यास घेतला व काशीला निघून गेले. ज्यावेळी विठ्ठलपंतांच्या गुरुंना ते विवाहित असल्याचे समजले त्यावेळी त्यांनी विठ्ठलपंतांना परत घरी जाण्याचा आदेश दिला. विठ्ठलपंतांनी सुध्दा गुरुआदेशामुळे गृहस्थाश्रमात पुन्हा प्रवेश केला. त्यांना निवृत्ती (जन्म १२६८ किंवा १२७३), ज्ञानेश्वर (जन्म १२७१ किंवा १२७५), सोपान (जन्म यांच्या जन्मकाळ लक्षात आला नाहि पण ज्ञानेश्वरांपेक्षा २-३ वर्षांने लहान म्हणजेच १२७४ किंवा १२७८ च्या सुमारास झाला असावा), मुक्ताबाई (जन्म १२७९ ) अशी चार अपत्ये झाली.
           विठ्ठलपंत तीर्थयात्रे निमित्त आळंदी येथे आले व तीथेच स्थायिक झाले. सन्यासामधुन परत येऊन गृहस्थाश्रमी प्रवेश केलेला असल्यामुळे विठ्ठलपंतांच्या परिवाराला समाजाने वाळीत टाकले. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज सुध्दा नाकारण्यात आली. यावर उपाय काय म्हणुन विठ्ठलपंतांनी तत्कालीन प्रतिष्ठित ब्राम्हणांना व धर्मशास्त्रींना विचारल्यावर यावर केवळ देहदंड हीच शिक्षा आहे असे त्यांना सांगण्यात आले. आपण प्रायश्चित केल्यानंतर समाज आपल्या मुलांना स्विकारेल या आशेने विठ्ठलपंत व त्याची पत्नी रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करुन देहांत प्रायश्चित केले.
         आई वडीलांच्या प्रायश्चित केल्यानंतर सुध्दा चारही भावंडांचा स्विकार समाजाने केला नाही उलट त्यांना संन्याशाची मुलं म्हणुन खुप त्रास दिला. त्याना अन्न पाण्यासारख्या मुलभूत गरजा सुध्दा नाकारण्यात आल्या, पुढे स्विकारपत्र मिळवण्यासाठी चारी भावंडे पैठण ला (धर्मपिठात) गेले. सुरवातीला तिथेही त्यांना खुप त्रास झाला पण शेवटी ज्ञानेश्वरांनी स्वतःची विद्वत्ता सिध्द केली (रेड्यामुखि वेद वदविले म्हणतात ते याच वेळी.. हि दंतकथा आहे किंवा उपमा अलंकाराचा प्रयोग किंवा सत्य आहे हा एक वादाचा मुद्दा आहे).
         ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे गुरु! धर्माचे ज्ञान फक्त संस्कृत येणार्‍या लोकांपर्यंतच राहते त्याचा फायदा उचलुन काही पुरोहित लोकांना फसवतात, कर्मकांड करायला लावतात अशी स्थिती त्यावेळी समाजाची झाली होती. सामान्य माणसालाहि खरा धर्म कळावा या उद्देशाने निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना भगवद्गीता मराठीत अनुवादित कर आणि ईश्वराचा ज्ञान रुपी प्रसाद सर्वांना वाट असा आदेश दिला.
         गुरुंच्या आदेशाला अनुसरून ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता मराठीत (प्राकृत) अनुवादित केली. एके ठिकाणी माऊली म्हणतात "माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।" आणि हि ओवी तंतोतंत खरी असल्याची खात्री आपल्याला ज्ञानेश्वरीचे वाचन करताना पटते. माऊली भगवद्गीतेला फक्त अनुवादितच करत नाही तर तो अनुवाद समजावा म्हणुन अनेक दंतकथेंचे दाखले सुध्दा जागोजागी देतात.
          ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाला भावार्थ दिपिका असे नाव दिले होते पण समाजाने ज्ञानेश्वरांनी सांगितली म्हणून "ज्ञानेश्वरी" याच नावाने हा ग्रंथ अभ्यासला व प्रसारीत केला. हा ग्रंथ ज्ञानेश्वरी या नावाने ईतका प्रसिध्द झाला कि, भावार्थ दिपिका हे मुळ नाव लोकांच्या विस्मरणात गेले.
          या ग्रंथाचे समापन माऊली प्रार्थनेने करतात, भगवद्गीतेच्या या निरुपणाला माऊली वाग्यज्ञ म्हणत  प्रार्थनेत समस्त विश्वात मांगल्य नांदो असा प्रसाद मागतात. तीच प्रार्थना आज पसायदान या नावाने प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीचा वेद-पुराणांचा, प्रचलित दंतकथांचा अभ्यास, मराठी भाषेवरील प्रभुत्व व त्यांची काव्य करण्याची प्रतिभा यांचे दर्शन आपल्याला ज्ञानेश्वरी वाचताना किंवा पारायण करताना होते.
           माऊली दुष्ट माणसांऐवजी त्याच्यामधिल दुष्टता संपावि, चुकिच्या रस्त्याला लागलेल्या माणसाला चांगले काम करण्याची बुद्धी मिळो, प्रत्येकाच्या चांगल्या इच्छेची पुर्ति व्हावी हिच प्रार्थना करतात.
            सहनशीलता, समाजाप्रति कळवळ, करुणा या गुणांमुळे ज्ञानेश्वरांना माऊली (आई) याच नावाने संबोधले जाते.त्यांनी रचलेल्या विश्व प्रार्थनेने म्हणजे पसायदानाने आपण ही पोस्ट संपवू... 

पसायदान (Pasaydan) :-
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो |
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छि तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वर्षत सकळमंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
चला कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टाद्दृष्ट विजयें हो । आवें जी ॥ ८ ॥
तेथे म्हणे श्रीविश्वेशरायो । हा होईल दानपसावो ।
येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥

टिप्पण्या