मुख्य सामग्रीवर वगळा

ध्यानाचे प्रकार - आनापान

मला ध्यानधारणा करण्यासाठी सगळ्यात सोपी आणि आनंददायी वाटणारी पध्दत... आनापान ही ध्यान सुमारे २६०० वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी शिकवली....
ध्यान नेमक कशावर किंवा कशाच करायचे? 
ध्यानाला सुरवात करण्या अगोदर आपल्याला आलंबन निवडावे लागेल. आता आलंबन म्हणजे काय? तर आपल्याला एखादी अशी गोष्ट ज्यावर आपल्याला मन केंद्रित करायचे आहे. उदा. तुम्ही मंत्र ध्यान करत असाल तर तुम्ही जो काही मंत्र निवडला आहे तो मंत्र म्हणजे तुमचे आलंबन. आपण आनापान संदर्भात बोलायचे तर आपला येणारा जाणारा श्वास आपले आलंबन निवडणार आहोत. 


आनापान ध्यान म्हणजे काय?
आन = येणारा श्वास
अपान = जाणारा श्वास
थोडक्यात येणार्‍या जाणार्‍या श्वासावर लक्ष देणे म्हणजे आनापान ध्यान.

आनापान ध्यान कसे करायचे?
१) आरामदायक स्थितीमध्ये पण कंबर, पाठ आणि मान सरळ राहील असे बसने. (हव तर मांडी घालून किंवा खुर्चीवर दोन्हीपैकी जे सुखकर होईल असे बसने)
२) अलगदपणे डोळे बंद करने
३) येणाऱ्या - जाणाऱ्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रीत करने.

कोणतेही ध्यान करताना एक गोष्ट सारखी होत राहते आणि ती म्हणजे लक्ष भटकणे उदा. तुम्ही एका शांत ठिकाणी बसून आनापान करत आहात, तुमच लक्ष याक्षणी पुर्णपणे श्वासावर केंद्रीत आहे, थोड्यावेळाने अचानक तुम्हाला आढळेल की तुम्ही ध्यान करता करता विचारांमध्ये - कल्पनांमध्ये हरवले आहात. अशावेळी सुरवातीला खुप चिडचिड होते पण प्रयत्न करा कि जेव्हा केव्हा तुमच मन भटकले आहे हे लक्षात येईल त्या त्या वेळी तुम्ही शांतपणे तुमचे सगळे लक्ष पुन्हा तुम्ही जे आलंबन निवडले आहे त्यावर आनाल..आनापान ध्यान सगळ्यात सहज पण खुप प्रभावी पध्दत आहे कारण आपण श्वासावर लक्ष देतोय आणि श्वास तर आपला सदैव चालु असतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या श्वासांचा आणि आपल्या मनाचा खुप घट्ट संबध आहे. थोड्याशा निरीक्षणातच आपल्या असे लक्षात येते की आपल्या विचारांचा आणि आपल्या भावनांचा सगळ्यात स्पष्ट प्रभाव आपल्या श्वासावर पडतो उदा. राग आला की आपोआपच आपण खुप पटपट श्वास घ्यायला लागतो, भिती वाटली की आपला श्वास अडकायला लागतो कींवा आपण रिलॅक्स असलो की आपला श्वास नकळतपणे खोल आणि दीर्घ व्हायला लागतो..
जसा आपल्या मनातल्या गतिविधिंचा आपल्या श्वासावर परीणाम होतो तसाच आपल्या श्वासांचा आपल्या मनावर परिणाम होतो. तुम्हाला डेमो पहायचाय? ठीक आहे आता मान, पाठ आणि कंबर सरळ करून बसा, मोबाईल बाजुला ठेवुन द्या आणि तीन चार वेळा नाकाने हळूहळू पण खोल श्वास घ्या दोन सेकंद रोखून धरा आणि नाकानेच हळूहळू श्वास सोडा...
थांबा थांबा वाचायची उत्सुकता चांगली आहे पण आधी एकदा सांगितलेले करून तर पहा... बघितले? कस वाटत आहे आता? नक्कीच थोडस हलक हलक वाटत असेल डोक्यावरचे ओझे कमी झाल्यासारखे, बरोबर ना? यावरून आपल्या हेच लक्षात येते की जसे मनाच्या अवस्थेचा आपल्या श्वासावर परिणाम होतो तसाच आपल्या श्वासाचा आपल्या मनावर परिणाम होतो... हा संबंध लक्षात आल्यामुळेच कदाचित आपल्या ऋषी मुनिंनी प्राणायमावर संशोधन केले असावे. असो.

आनापान ध्यान करताना असे भरपूर वेळा होईल की आपल लक्ष श्वासावर आहे आणि अचानक दुसरे काहितरी मनात आले आणि अशावेळी परत लक्ष श्वासावर घेऊन या. 
सुरुवातीच्या किमान दोन तीन आठवड्यांसाठी तरी फक्त श्वास येतोय की जातोय यावरच लक्ष केंद्रित करा. त्यानंतर ज्यावेळी बर्‍यापैकी श्वास जाणवायला लागेल तेव्हा हळूहळू नाकात आणि नाकाच्या खाली कुठे कुठे स्पर्श करून आत येतोय किंवा बाहेर जातोय याबद्दल सुध्दा जागृकता बाळगायला लागा आणि सराव करत रहा... 

आपण खुपदा अशी चूक करतो की अरे यार ईतके आठवडे झाले किंवा ईतके महिने झाले तरी ध्यान करता मन लागत नाही किंवा मध्येच विचार येतात तर वेगळे असे काही नाही ते स्वाभाविक आहे. आपण ध्यानासाठी बसलो की लगेच आपल मन एकाग्र व्हायला हवे, किंवा आपण ज्यावेळी ध्यान करायला बसलो त्यावेळी आपल्याला विचारच येऊ नयेत असा विचार करण्यात काहीही अर्थ नाही विचार करने हा मनाचा स्वभाव आहे त्यामुळे मन भटकणारच नाही अस होण्याची शक्यता खूपच कमी आहे, अर्थात जर तुमच मन तितके शांत असेल तर उत्तमच पण मनाला जबरदस्तीने शांत करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या असे लक्षात येईल की विचार आधीपेक्षा जास्त ताकदवान झाले आहेत. 
ज्यावेळी तुम्ही ध्यान करायला बसणार आहात त्यावेळी फक्त एवढाच विचार करा की हा वेळ मी माझ्या सोबत घालवत आहे. 

सुरवातीचे काही दिवस तुम्हाला खालील व्हीडिओ मार्गदर्शन करेल (डाऊनलोड करून घेतला तर जास्त योग्य राहील) https://youtu.be/byyz8FAvSsE

मी माझ्या ध्यान प्रवासाबद्दल व्यक्त मन - भाग 2 ध्यान  या पोस्ट मध्ये सांगितले आहे ती पोस्ट देखील वाचायला विसरू नका.

तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली हे सांगा कींवा नका सांगू पण कीमान दोन महिने रोज अर्धाच तास किंवा किमान 15 20 मिनिटे ध्यान करण्यासाठी देऊन ध्यान करण्याच्या फायद्यांचा अनुभव नक्कीच घ्या... 


टिप्पण्या